मागील तीन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सरासरी पाऊस नोंदविला गेला. काही तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. त्यामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यातही वाढ नोंदविली गेली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारच्या उपग्रह छायाचित्रानुसार मराठवाडा विभागातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा आणि खान्देशातील जळगाव, नाशिक, धुळे आणि राज्य सीमा परिसरात सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरवर्षी पीक काढणीला असताना पाऊस होतो. त्यामुळे यंदाही तीच परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, या पावसाने कमी अवधीच्या मूग, उडीद, सोयाबीन आणि इतर पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अकोला, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा आणि लगतच्या परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे. संपूर्ण कोकणात अतिवृष्टी तर पुणे विभागात विशेषत: कोल्हापूर, सांगली, सातारा तुरळक ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे.
- संजय अप्तूरकर, हवामान अभ्यासक