अकोला: लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी ‘हेल्प डेस्क’ पथक तयार ठेवण्यात येत आहे. या पथकाद्वारे विशेष सोयी-सुविधा या घटकांना दिल्या जाणार आहेत. त्यातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हातभार लागणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असलेल्या मतदान केंद्रात हेल्प डेस्क पथकाचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रशिक्षणार्थी अधिकारी मिताली सेठी यांच्याकडे देण्यात आली आहे. या पथकात विविध कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडणारे, केंद्राची सुरक्षा करणाऱ्यांसोबत हे तिसरे पथक कार्यरत राहील. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कर्मचाºयाचा सहभाग राहणार आहे. त्याशिवाय, दिव्यांग, ज्येष्ठ, महिलांना मदत करण्यासाठी दोन मुले, दोन मुलींची निवड केली जाईल. स्तनदा मातांना बाळ ठेवण्यासाठीची सोयही केली जाणार आहे. असमर्थ मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही केली जाईल. केंद्रात मतदानासाठी येणाºयांसाठी प्रथमोपचार किट, औषधे उपलब्ध ठेवली जातील. ती किट गावातील आशा स्वयंसेविकेसाठी उपलब्ध राहील. दिव्यांगासाठी ३२ रॅम्पची नव्याने निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये अकोला-२, अकोट-तेल्हारा-९, बाळापूर-पातूर-१७, बार्शीटाकळी-मूर्तिजापूर- ४ रॅम्पचा समावेश आहे, असेही आयुष प्रसाद यांनी सांगितले. मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधांचे नमूना विभागीय आयुक्तांनी मान्य केला असून, त्याबाबत पुढील आदेश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.