साहेबराव राठोड/ मंगरुळपीर (जि. वाशिम) : शेतकर्यांची परिस्थिती पाहता, तालुक्यातील शेलूबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालयाच्या चिमुकल्यांनी जमा केलेले खाऊचे पैसे दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत म्हणून दिले. शाळेतर्फे होणार्या अन्य खर्चाला आळा घालून शाळा व विद्यार्थ्यांंची एकत्रित रकमेचा धनादेश नाम फाउंडेशनच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. शेलूबाजार येथील सुरेशचंद्र कर्नावट हे नेहमीच गरजूंना मदत करतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विद्यार्थ्यांंनीही दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी आपल्यापरीने मदतीचा हात पुढे केला आहे. लक्ष्मीचंद विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांंनी जमा केलेले १ हजार १५५ रुपये आणि शाळा व्यवस्थापनाने नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणार्या अवांतर खर्चाला फाटा दिला व ही रक्कम नाम फाउंडेशनच्या स्टेट बँकेतील खात्यात जमा करण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकर्यांबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांंना माहिती दिली. या सामाजिक कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांंनी खाऊची रक्कम जमा करून दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांंना मुख्याध्यापक भुसारी, पर्यवेक्षक राऊत तसेच वर्गशिक्षक विनोद मारुती सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.
खाऊ च्या पैशांतून चिमुकल्यांची दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 1:51 AM