अकोला : आस्मानी सुल्तानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या अडचणी प्रलंबित आहे. खरीप हंगाम तोंडावर असून शेतकऱ्याचे नियोजन कोलमडत आहे. कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला शेतात फेकून द्यावा लागत आहे. शासनाने आदेश काढून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी भारत कृषक समाजचे चेअरमन डॉ.प्रकाश मानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली.
--------------------------------------------------------------
गावागावातील हातपंप नादुरुस्त
अकोला : जिल्ह्यातील गावागावांत असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. प्रशासनाच्यावतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप तयार करण्यात आले. मात्र या हातपंपांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
--------------------------------------------------------
‘वाजंत्रीना आर्थिक मदत द्या’!
अकोला : वाजंत्री व बँड वाजविणाऱ्या लोकांचा व्यवसाय कडक निर्बंधांमुळे ठप्प झाला आहे. या व्यवसायावर जगणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुुळे या व्यावसायिकांना मदत देण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------------------------
औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज
अकोला : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली; परंतु अद्यापही तेथे पाहिजे त्या प्रमाणात उद्योग उभे राहू शकले नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
---------------------------------------------------------------
बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले!
अकोला : सध्या कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण तयार होत आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर वाढत आहे. अशात सर्दी-खोकला झाला तरी हा कशापासून? या विचाराने नागरिक धास्तावलेले आहेत.
-----------------------------------------------------------------
रासायनिक भाज्यांमुळे आजारात वाढ
अकोला : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपिक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.