अकोला : अकोलेकरांचा जीव वाचविणारे शहरातील सर्पमित्र बाळ काळणे यांचा जीव कर्करोगामुळे धोक्यात आला आहे. घरात साप निघताच ज्या हक्काने त्यांना मदत मागितल्या जाते, त्याच हक्काने या सामाजिक कार्यकर्त्याला अकोलेकरांनी मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकमतच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी श्रीराम नवमी शोभायात्रा समिती व जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठाणच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. अकोलेकरांच्या सेवेत वाहून घेतलेल्या सर्पमित्र बाळ काळणे यांना कर्करोगाची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले. सद्यस्थितीत बाळ काळणे यांच्यावर तुकाराम हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात असून त्यांना अकोलेकरांच्या मदतीची गरज आहे. त्यांच्या या संघर्षमय उपचारासाठी लोकमतने मदतीचे आवाहन केले असता नेहमीप्रमाणे श्रीराम नवमी शोभायात्रा समिती धावून आली. त्यांच्या दिमतीला सामाजिक संवेदनेची जाणीव ठेवत जुने शहरातील जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठाणने पुढाकार घेतला. बुधवारी शोभायात्रा समितीचे सर्वेसर्वा आमदार गोवर्धन शर्मा, जय बाभळेश्वर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेश शाहू, सहसचिव प्रशांत नागरे, भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्याहस्ते बाळ काळणे यांना २१ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी मा.स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, गिरीश जोशी, सुधाकर मोरे, संदीप वाणी, नवीन गुप्ता, नितीन जोशी, रविंद्र भंसाली, बाळकृष्ण बिडवई उपस्थित होते. आ.गोवर्धन शर्मांचे शासनाला पत्र सर्वसामान्यांचा जीव वाचविणारे सर्पमित्र बाळ काळणे यांच्या उपचारासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मागणी करीत पत्रव्यवहार केला आहे. पहिल्या टप्प्यात ७५ हजार रुपये मंजूर होण्याची अपेक्षा आहे. मदत करताय,हा घ्या क्रमांक! बँकेचे नाव - सेंट्रल बँक आॅफ इंडिया खाते क्रमांक - १५८६९३३२३७ आयएफएससी कोड - सीबीआयएन ०२८४४१६
सर्पमित्र बाळ काळणेंच्या मदतीसाठी संघटना सरसावल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 8:23 PM