लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कितीही संकटे आली तरी संवेदनशील समाजाचे दातृत्व कमी झाले नव्हते; मात्र कोरोनाच्या संकटामुळे दातृत्वाचे संवेदनशील हातही थकले आहेत. आेंजळ भरू न देणारे अनेक हातच रिकामे राहत असल्याने त्याचा परिणाम समाजतील अनाथ, निराधार व विशेष बालकांच्या संगोपनावरही होत आहे. दानदात्यांची संख्या रोडावल्यामुळे जिल्ह्यातील अनाथालय, बालगृहांची मदत ‘लॉक’ झाली आहे.गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. सतत वाढणाऱ्या आजाराने समाजमन सुन्न झाले आहे. अशा परिस्थितीत समाजाच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असलेल्या अनाथाश्रमांवर एक प्रकारची अवकळा आली आहे. एकीकडे दानदात्यांकडून येणारी मदत थांबली असून, दुसरीकडे या संस्थांमध्ये साजरे होणारे आनंदी कार्यक्रमही बंद झाले आहेत.आर्थिक अडचणींचा सामना करताना संवेदनशील नागरिकांकडून मिळणारा आनंदही हिरावला गेला आहे.अकोल्यातील सूर्याेदय हे बालगृह विशेष मुलांचे बालगृह आहे. येथे एचआयव्हीबाधित ४८ मुले सध्या असून, हे बालगृह एचआयव्हीबाधिताचे विदर्भातील पहिले बालगृह आहे. भय्यूजी महाराजांच्या संकल्पनेतून या बालगृहाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली होती.समाजातील दानदात्यांच्या आधारावर येथील मुलांचे संगोपन होत आहे. कोरोना संकटाच्या काळात मात्र येथे येणारी मदतच लॉक झाली असल्याने बालगृहातील बालकांच्या संगोपनाासाठी सध्या तारेवरची कसरत सुरू आहे. अशीच स्थिती आनंदाश्रम, गायत्री, उत्कर्ष अशा संस्थांचीही आहे.
स्वस्त धान्य दुकानांमधून व्हावा पुरवठाया संस्थांसाठी स्वस्त धान्य दुकांनामधून धान्याचा पुरवठा केला जावा, यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत मार्ग काढण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच अनाथ मुलांसाठी एक अॅक्शन प्लॅनच आखला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने होण्याची गरज आहे.
शासकीय अनुदानाचा विचार व्हावा!समाजातील दातृत्वशक्तीही अडचणीत येऊ शकते, याचा धडा कोरोना संकटामुळे मिळाला आहे. यापासून बोध घेत शासनाने आता तरी अशा सामाजिक संस्थांना शासकीय अनुदान देण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. अनुदानाविना सुरू असलेल्या या मानवतावादी कार्यात शासनाच्या अनुदानाचा आधार मिळाल्यास कुठल्याही संकटाचा सामना करण्यास अशा संस्था सक्षम राहतील.
आनंद देणारे कार्यक्रमही थांबले!समाजतील संवेदनशील लोक, तरुण त्यांचे वाढदिवस किंवा इतर आनंदाचे सोहळे आश्रमात येऊन साजरे करायचे; सण- उत्सव असला की अनेकांच्या घरून खाद्यपदार्थ, फराळ यायचे. सकाळचा नाश्ता, जेवण हे सतत मुलांना मिळत होते. महिन्यातील १५-२० दिवस अशाच कार्यक्रमात जात असत. आता मात्र कोरोना महामारी सुरू झाल्यापासून हे सर्व कार्यक्रम बंद झाले.
दातृत्वाच्या काही हातांनी सावरले!कोरोना संकटामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या समाजातील अनेक दात्यांनी याही स्थितीत दातृत्वाची परंपरा सांभाळली आहे. त्यांनी मदतीचे स्वरूप कमी केले असले तरी बंद केले नाही, एवढाच काय तो दिलासा या आश्रमांना मिळाला आहे.
समाजाच्याच सहकार्याने अशा मुलांचे संगोपन आम्ही करत असतो. आता समाजच अडचणीत आल्यामुळे आमच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. काही दात्यांच्या मदतीने सध्या काम भागत असले तरी मदतीचा ओघ पूर्वीप्रमाणे होईपर्यंत अडचणी आहेतच. शासनानेही यासंदर्भात दखल घेण्याची गरज आहे.-शिवराज खंडाळकर, अधीक्षक, सूर्याेदय बालगृह.