अकोला : काविळाच्या वाढत्या प्रभावाला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यांतर्गत जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय व सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नि:शुल्क हिपॅटायटिस स्क्रीनिंग टेस्ट आणि प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या उपक्रमाला रविवार जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे.जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त रविवार, २८ जुलै रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे हिपॅटायटिस जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण आणि वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्क्रीनिंग करून त्यांना हिपॅटायटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये हिपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई या पाच प्रकारच्या आजारांचे निदान करण्यात आले. सोबतच आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हिपॅटायटिसविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांची मोफत स्क्रीनिंग करून त्यांना हिपॅटायटिस प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे.कोण घेऊ शकते लस?हिपॅटायटिस म्हणजेच कावीळ हा साथीचा आजार असल्याने कोणालाही होऊ शकतो. हा आजार होऊच नये, यानुषंगाने आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. ही लस घेण्यासाठी कोणतीही अट नसल्याने कोणीही ही लस घेऊ शकते.कावीळ हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वच्छता बाळगून स्वच्छ पाणी प्यावे, काविळाचा धोका पाहता रविवारपासून जिल्ह्यात सर्वत्र हिपॅटायटिस प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात येणार आहे. ही लस जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.