जिल्ह्यासह शहरात आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. चाचणी केल्यानंतर अनेक रुग्णांना दोन ते तीन दिवसांच्या विलंबानंतरही अहवालाबद्दल माहिती प्राप्त हाेत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा रुग्णांसाेबतच कमी लक्षणे असलेल्या ‘होमक्वारंटीन’ रुग्णांकडून बेजबाबदार वर्तन केले जात आहे. असे रुग्ण शहरात खुलेआम फिरत असल्याने संशयितांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ रुग्ण बाहेर फिरल्याने कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी शहरातील कोरोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात लक्ष (वाॅच) ठेवून तपासणी करण्याची मोहीम महापालिका, महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने सुरू केली आहे. यामध्ये २२ मार्च रोजी ‘होमक्वारंटीन’ असलेल्या ५७ रुग्णांच्या घरी जाऊन रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यात आली.
घराबाहेर फिरणाऱ्या रुग्णाविराेधात तक्रार
शहरात पश्चिम झाेन भागातील शिवसेना वसाहतमध्ये खेंडकर नामक व्यक्तीला काेराेनाची लागण झाल्यामुळे त्याला हाेमक्वारंटीनचे निर्देश देण्यात आले. परंतु काेराेनाला न जुमानता हा रुग्ण घराबाहेर बिनधास्तपणे फिरत असल्याची बाब समाेर आली. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला. मनपा प्रशासनाला नाव सांगितल्यास याद राखा,अशा स्वरूपाच्या धमक्या नागरिकांना दिल्या जात असल्याची माहिती झाेन अधिकारी राजेंद्र टापरे यांना प्राप्त हाेताच त्यांनी संबंधित रुग्णाविराेधात जुने शहर पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली.
असे आहे पथक
कोरोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ रुग्णांवर ‘वाॅच ’ ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका,महसूल व पोलीस अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकांकडून रुग्णांच्या घरी आकस्मिक भेटी दिल्या जात आहेत.