बार्शीटाकळी : बार्शीटाकळी-रेडवा रस्त्याने पिंपळखुटा विद्युत उपविभाग कार्यालयापर्यंत उच्चदाब विद्युत खांब उभारण्याचे काम सुरू आहे. उच्च दाब विद्युत खांब उभारणीचे काम रस्त्यावर सुरू असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरणारे खांब त्वरित हटवून न्याय देण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
बार्शीटाकळी-रेडवा मार्गाने उच्च दाब विद्युत खांब उभारणीचे काम सुरुवातीला शेतकऱ्यांच्या शेतातून होणार होते. यामध्ये शेतातील पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन काम तातडीने थांबविण्याची मागणी केली. यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, काम थांबविण्यात आली, पण संबंधित कंपनीने कामाची दिशा बदलली असून, विद्युत खांब उभारणीचे काम रस्त्याने सुरू केले आहे. यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच रस्त्याने खांब उभारणीसाठी खड्डे खोदून ठेवल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देऊन विद्युत उभारणीचे काम थांबविण्याची मागणी बार्शीटाकली-रेडवा मार्गावरील रहिवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर सै अरशद, साबिर उल्ला खा, अय्याज खान, मो इमरान, हसन शहा, मो नासीर, शकील शहा, मों अन्सार, साहब खाँ, इकबाला खा, इमरान शहा, शेख फिरोज, शहजाद खां, मो मोहसीन यासह ७२ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (फोटो)