लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वसुधा नमामि गंगे स्वच्छता अभियानांतर्गत अत्याधुनिक सुविधांसह पर्यावरणपूरक स्मशानभूमीचे निर्माण उमरी येथे होत आहे. गोवऱ्यांवर मृतदेहाच्या दहनाची सुविधा असणाररी ही स्मशनभूमी अकोला पूर्व मतदारसंघात होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वन पर्यावरण मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार ७ आॅगस्ट रोजी या स्मशानभूमीला भेट देणार आहेत. त्या निमित्ताने गुरूवारी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय विदेश विभाग प्रमुख प्रशांत हरताळकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, भाजपा शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, सभापती बाळ टाले यांनी कामाची पाहणी केली. अकोल्यात साकारल्या जात असलेल्या या स्मशानभूमी पॅटर्ननुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी मतदारसंघात १३ कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमीचे काम सुरू केले आहे हे विशेष !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन आ. रणधीर सावरकर यांनी त्यांच्या विकास निधी अंतर्गत व वसुधा वूडलेस क्रिमेशन फाउंडेशनच्या माध्यमातून १ कोटी १० लाख रुपये खर्च करून उमरी येथील स्मशानभूमी अत्याधुनिक करण्याचा संकल्प केला आहे. खा. संजय धोत्रे व ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनात आ. रणधीर सावरकर यांनी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करून या भागात उमरी येथील स्मशानभूमीमध्ये काम सुरू केले आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय विदेश विभाग प्रमुख प्रशांत हरताळकर यांच्या मातोश्री स्व. लीलाताई हरताळकर यांच्या वर्षश्राद्धाचे निमित्त साधून आ. रणधीर सावरकर यांनी या कामाला सुरुवात केली होती. हे काम पुर्ण झाल्यानंतर पहिल्या मृतदेहास दहनाकरीता २५० गोवऱ्या लागतील त्यांनतर मात्र प्रत्येक मृतदेह दहनाकरिता केवळ ४० ते ५० गोवऱ्या लागणार आहेत. हा प्रयोग देशातील पहिला प्रयोग असल्याचा दावा वसुधा वूडलेस क्रिमेशन फाउंडेशनने केला आहे. उमरी येथील स्मशानभूमीत शिवानी कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामग्री लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री व वन पर्यावरण मंत्री ७ आॅगस्ट रोजी येण्याची शक्यता असल्यामुळे या कामाला गती देण्या संदर्भात बुधवारीआ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, प्रशांत हरताळकर, शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल सभापती बाळ टाले, अधीक्षण अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, श्रीराम पटोकार, शेळके गणेश काळकर, शशांक जोशी, सुनील पसारी, गिरीश जोशी आदींनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. या स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्याची जबाबदारी या भागातील नगरसेवकांनी घेतली. खा. संजय धोत्रे हे शेतकरी अभियंता उद्योजक सोबत सर्व समाजाशी एकरूप राहणारे नेतृत्व असून, त्यांनी अकोला पूर्व या मतदारसंघात संस्कृती, धर्म, संस्कार, परंपरेला आधुनिकतेची व विज्ञानाची जोड देऊन देशातील पर्यावरण रक्षक स्मशानभूमी उभी राहावी, यासाठी केलेले मार्गदर्शन व प्रशांत हरताळकर यांची कल्पकता, पुढाकार व आ. रणधीर सावरकर यांचा संकल्पनेमुळे अकोल्याच्या नावलौकिकामध्ये भर टाकणारा हा प्रकल्प देशाला दिशा व प्रेरणा देणारा ठरणार आहे.
उमरीतील स्मशानभूमी होणार हायटेक!
By admin | Published: June 30, 2017 1:06 AM