नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) प्रकल्प हा प्रामुख्याने हवामान बदलावर आधारित आहे. यामुळे प्रकल्पात निवड केलेल्या गावांचे सूक्ष्म नियोजन केले जाते. पोकरा योजना जिल्ह्यामध्ये सात तालुक्यातील ४८५ गावांत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आवश्यक विविध योजना, शेतीपयोगी साहित्य अनुदानावर देऊन शेतकऱ्यांना बळ देण्याचा शासनाचा उद्देश आहे. जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ४५ हजार ४२८ अर्ज प्राप्त झाले आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या प्रमाणात अर्जांना पूर्व संमती देण्यात येत आहे. पोकरा योजनेमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांसह गटांना मदतीचा हात मिळत आहे; परंतु योजनेची गती कमी असल्यामुळे जिल्ह्यात ५ हजार १९० लाभार्थींना लाभ मिळू शकला आहे. विविध स्तरावर अनेक अर्ज प्रलंबित आहे. या प्रलंबित अर्जाच्या संख्येत दैनंदिन बदल होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अकोला उपविभागात २३ हजार ४९६ तर अकोट उपविभागात २१ हजार ९३२ अर्ज प्राप्त झाले आहे.
--बाॅक्स--
कृषिमंत्र्यांनी दिली होती तंबी
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली होती. पोकरा योजनेत मागे असलेल्या जिल्ह्यांमध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी योजनेच्या कामावर नाराजी व्यक्त करत कृषी विभागातील अधिकाऱ्यांना तंबी दिली होती.
--बॉक्स--
शेतकरी स्तरावर प्रलंबित अर्ज
४९२६
मोक्का तपासणीसाठी प्रलंबित अर्ज
१४३१
अकाऊंट अधिकाऱ्याकडे प्रलंबित अर्ज
४५
मुंबईत मंजुरीसाठी प्रलंबित अर्ज
१५६८
--कोट--
पोकरा योजनेत केवळ मोठे आश्वासन दिल्या गेले आहे. यामध्ये काहीच शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून अनुदान अजूनही देण्यात आले नाही. ही योजना कागदावरच दिसून येत आहे.
मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच