अकोला: शहरात उष्णतेची लाट आली असून, या मोसमात तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी ४५.३ अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद घेतली. परिणामी रविवारी दुपारी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते.सकाळी ९ पासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. रस्त्यावरून दुचाकीने किंवा पायी जाताना प्रत्येक जण तोंडाला व डोक्याला बांधल्याशिवाय जाताना दिसत नव्हता. सकाळी रस्त्यांवर जशी वर्दळ होती, तशी वर्दळ दुपारी नव्हती. रस्ते निर्मनुष्य झाले. बाजारपेठेत शुकशुकाट झाला. वातानुकूलित यंत्रणादेखील उष्णतेपुढे अपुर्या पडत असल्याची स्थिती होती. घरात पंखे उष्ण वारा देत असल्याने नागरिक हैराण झाले होते. विशेष म्हणजे, रुग्ण, लहान बाळ आणि वृद्ध यांना या उष्ण लहरींचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. मागील वर्षापेक्षा यावर्षी सतत तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर राहिले आहे.गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस कमाल तापमान ४४.६ व ४४.२ अंश सेल्सिअस एवढे होते. एप्रिल महिन्यात १६ एप्रिल रोजी ४४.४ अंश सेल्सिअस तापमान होते. २0 एप्रिल रोजी पुन्हा कमाल तापमान ४५ अंशावर पोहोचले होते. १ मे रोजी ४४.७ अंशापर्यत तापमान पोहोचले होते.
मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2016 1:35 AM