अकोला: इयत्ता दहावीचा गुरुवारी हिंदी भाषेचा पेपर होता. या पेपरलाही महिला भरारी पथक व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पथकाने पाच कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांंना निलंबित केले. मंगळवारी भरारी पथकांनी जिल्हय़ातील विविध ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर दहा विद्यार्थ्यांंंना निलंबित केले होते. १ मार्चपासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेस जिल्हय़ातील ३१ हजार विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. जिल्हय़ात ११६ केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरू आहे. मंगळवारी मराठी विषयाचा पेपर झाल्यानंतर गुरुवारी हिंदी भाषेचा पेपर होता. परीक्षेदरम्यान कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. या भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षेवर नियंत्रण ठेवल्या जाते. गुरुवारी हिंदी विषयाच्या पेपरदरम्यान पाच विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विस्तार शिक्षण अधिकारी स्मिता परोपटे यांच्या नेतृत्वातील महिला भरारी पथकाने कुरणखेड येथील संत गजानन महाराज विद्यालय परीक्षा केंद्रावर धाड टाकून येथील एक विद्यार्थी निलंबित केला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांच्या पथकाने आकोट तालुक्यातील देवरी येथील नवयुग विद्यालय परीक्षा केंद्रावरील एक आणि मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विद्यालय परीक्षा केंद्रावरील एका विद्यार्थ्यास निलंबित केले. शुक्रवारी इयत्ता बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे आणि इयत्ता दहावीचा ५ मार्च रोजी महत्त्वाचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे.
हिंदीच्या पेपरलाही पाच कॉपीबहाद्दर निलंबित
By admin | Published: March 04, 2016 2:19 AM