अकोला: जुने शहरातील गुलजारपुरास्थित हिंदू दफनभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना जागाच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. या ठिकाणी अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांना स्थानिक अतिक्रमकांकडून आडकाठी निर्माण केल्या जाते. सदर प्रकरण ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरल्यानंतर उशिरा का होईना, मनपा प्रशासनाने दफनभूमीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे तीन लाख रुपये शुल्काचा भरणा केल्याची माहिती आहे.हिंदू समाजातील रूढी, परंपरेनुसार काही पंथांमध्ये मृतदेहाला अग्नी न देता त्यांच्यावर दफनभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यानुषंगाने जुने शहरवासीयांसाठी गुलजारपुरा भागात हिंदू स्मशानभूमी आणि हिंदू दफनभूमीची जागा उपलब्ध आहे. दफनभूमीसाठी सुमारे १३ एकरापेक्षा जास्त जागा उपलब्ध होती. गत वीस ते बावीस वर्षांच्या कालावधीत दफनभूमीच्या जागेवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून, त्या ठिकाणी पक्की घरे उभारली आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणाच्या समस्येकडे स्थानिक नगरसेवकांसह मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमकांनी दफनभूमीची संपूर्ण जागाच गिळंकृत केल्याचे चित्र आहे. कधीकाळी १३ एकरापेक्षा जास्त असलेली जागा आज रोजी अवघ्या पाच ते सहा हजार चौरस फुटांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या जागेमध्ये ठिकठिकाणी अवघ्या दीड ते दोन फुटाच्या अंतरावर मृतदेह गाडल्या जात आहेत. या ठिकाणी जागा शिल्लक नसल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.भूमी अभिलेख विभागाकडे शुल्काचा भरणा४मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार नगररचना विभागातील कर्मचारी राजेंद्र टापरे यांनी गुलजारपुरा येथील शिट नं. १५ प्लॉट ७ आणि शिट नं. १६ प्लॉट ४ वरील अनुक्रमे ४ एकर व ५६ गुंठा जागेच्या शासकीय मोजणीसाठी तातडीच्या शुल्कापोटी भूमी अभिलेख विभागाकडे तीन लाख रुपयांचा भरणा केल्याची माहिती आहे.
दफनभूमीच्या जागेची शासकीय मोजणी झाल्यानंतर पुढील कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे. अतिक्रमकांनी स्वत:हून जागा मोकळी करून दिल्यास त्यांचे नुकसान होणार नाही, अन्यथा कारवाई करावीच लागेल.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.