मूर्तिजापूर : जवळपास शंभर वर्षे पूर्ण होत असलेल्या मूर्तिजापुरातील ऐतिहासिक इको-फ्रेण्डली हजारी गणेश मंडळ विदर्भात विख्यात आहे. जुनी बस्ती परिसरातील पर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकी आणि वैशिष्ट्य जपणाऱ्या हजारी गणेश मठ पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या येथील गणेश बाप्पाच्या मंदिराला दोनशे वर्षांची, तर गणेशोत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे.
मलापुरा येथील गणेशजीचे मंदिर आहे. येथील समाजसेवक चंद्र हजारी यांचे पणजोबा हरिसिंग हजारी यांनी बाप्पाच्या मंदिराची दोनशे वर्षांपूर्वी स्थापना केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवापूर्वीपासूनच हजारी गणपती बाप्पाचा परंपरागत उत्सव किशोरचंद्र हजारी आणि त्यांचे चिरंजीव राजेश हजारी यांनी आजही सुरू ठेवला आहे. दरवर्षीप्रमाणे जन्माष्टमीपासून सदर उत्सव मोठ्या थाटात सुरू होतो. मंदिरात सुखकर्ता, दुखहर्ता, चिंतामणी आणि विघ्नहर्ता बापाच्या मूर्ती आहेत. मध्य भागात राधा-कृष्णाची मनमोहक मूर्ती असून, दोन्ही बाजूला दोन-दोन शिल्पकाष्ट गणेशमूर्ती आहेत. गणेश चतुर्थीला बाजारातील मातीच्या एका छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व निरोपाच्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन केले जाते.
मठ साधुसंतांचे विश्रांतीस्थान
संपूर्ण भारतातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या साधुसंतांना विश्रांतीकरिता या ठिकाणी योग्य व्यवस्था आहे. गणेशोत्सवादरम्यान या ठिकाणी भजन, कीर्तन, भागवत, रामायण व इतर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. निरोपाच्या दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत या गणरायाचा मान असतो. ढोल-ताशाच्या तालावर नव्हे तर ढोल आणि पखवाजीच्या भजनाच्या आठवणीतील बापाला मिरवणुकीत सहभाग लक्ष्यवेधी ठरतो. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे किशोरचंद्र हजारी दरवर्षी एका गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहाचा खर्च उचलतात.
काष्टरूप चार गणेशमूर्तींना दिले जातात नैसर्गिक रंग!
पर्यावरणपूरकतेचा संदेश देऊन हजारी गणेशोत्सव संशोधित इको-फ्रेण्डली पर्यावरणपूरक वैशिष्ट अनुकरणीय आहे. दरवर्षी चारही काष्ट रूप गणेशमूर्तींचे रंगकाम मूर्तिकार किंवा रंगारी अजिबात करीत नाही. तर बाजारातील रंगसुद्धा वापरला जात नाही. मूर्तींना अभ्रक साखर, जवस, डिंक, लिंबू व गोट्याची रंगीत पूड करून घरी रंग तयार करून दिला जातो, अशी माहिती प्रशांत हजारी यांनी दिली.
फोटो: