दरवर्षी रस्ते अपघातांत हेल्मेट न घातल्याने अनेक जीव जातात तर गॅसगळती किंवा गॅस सिलिंडरच्या वजनाने अनेक गृहिणींना त्रास होतो. यावर उपाय करीत हाता येथील विद्यार्थ्यांनी गणित/ विज्ञान विषय शिक्षक नीलेश धांडे यांच्या मदतीने ॲडव्हान्स न्यू जनरेशन हेल्मेट व ॲडव्हान्स गॅस सिलिंडर स्टॅण्ड प्रोजेक्ट तयार करून तो भारत सरकारच्या विज्ञान व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला सादर केला. या प्रकल्पाची निवड इन्स्पायर अवाॅर्डसाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक तंत्रज्ञानात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन भारत सरकारद्वारे प्रोत्साहन दिले जाते. या वर्षी इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी बाळापूर तालुक्यातील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, हाता येथील इयत्ता ७ वीचा विद्यार्थी हरिओम संतोष पटोकार व ८ वीचा विद्यार्थी प्रतीक किशोर दामोदर यांच्या अनुक्रमे ॲडव्हान्स न्यू जनरेशन हेल्मेट व ॲडव्हान्स गॅस सिलिंडर स्टॅण्ड प्रोजेक्टची निवड झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.
रस्ता सुरक्षा व मनोरंजन
रस्ता सुरक्षा व मनोरंजन या तत्त्वांवर आधारित हेल्मेट प्रोजेक्ट असून या प्रोजेक्टमुळे गाडी चालविताना मनोरंजनासोबतच मागील बाजूने रात्रीच्या वेळी वाहन येत असल्यास त्याची सूचना लगेच मिळेल. सोबतच हेल्मेटला असलेल्या वायपर सुविधेमुळे पाऊस सुरू असताना गाडी चालविणे अधिक सोयीस्कर होईल तसेच रात्रीच्या वेळेस मागील वाहनास गाडी चालक स्पष्टपणे दिसेल व अपघातांचे प्रमाण कमी होईल. सुरक्षितता व सहजता या गोष्टींवर आधारित सिलिंडर स्टॅण्ड प्रोजेक्टची निर्मिती असून, यामुळे सिलिंडर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेता येईल. शिवाय गॅस सिलिंडर घेताना त्याचे वजन केले गेल्यामुळे योग्य प्रमाणात सिलिंडर भरलेला आहे की नाही ते कळेल. शिवाय गॅस लिकेज डिटेक्टरमुळे संभाव्य धोका टळेल; तसेच गॅस सिलिंडर अचानक संपल्यामुळे गृहिणींची वेळेवर होणारी तारांबळही गॅस रिझर्व लागल्याची सूचना मिळाल्यामुळे थांबेल. प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी विशेष मार्गदर्शन विषय शिक्षक नीलेश धांडे यांनी केले तर इलेक्ट्रॉनिक्स जोडणीसाठी संतोष वडतकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक
जि.प. सदस्य संजय बावणे, पं.स. सदस्य गजानन उगले, केंद्रप्रमुख मुरलीधर अहिर, शा.व्य. समिती अध्यक्ष किशोर दामोदर, मुख्याध्यापक अन्सार खान तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे तसेच बाल वैज्ञानिकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्याचप्रमाणे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र शाळेला मिळाले आहे, अशी माहिती नीलेश मधुकरराव धांडे गणित विज्ञान विषय शिक्षक जि.प. वरिष्ठ प्रा. शाळा हाता यांनी दिली.