- प्रवीण खेतेअकोला : ‘एचआयव्ही’ हा शब्द ऐकताच अंगावर शहारा येतो; पण सध्या त्याचं सर्वाधिक संकट थॅलेसेमियाग्रस्तांवर ओढवल्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज अकोल्यातील जिल्हा एड्स नियंत्रण केंद्रांतर्गत थॅलेसेमियाग्रस्तांच्या तपासणीतून बांधता येऊ शकतो. या अहवालानुसार, २१ थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांपैकी चार बालकांना ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हीच स्थिती राज्यातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.‘एचआयव्ही’ म्हटलं, की असुरक्षित शारीरिक संबंध हाच विचार बहुतांश लोकांच्या डोक्यात येतो; परंतु रुग्णांना बाहेरून रक्त देण्याच्या प्रक्रियेतूनदेखील ‘एचआयव्ही’ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे विंडो पिरीएडमधील एचआयव्हीग्रस्त रक्तदाता. याचा सर्वाधिक धोका थॅलेसेमियाग्रस्तांना आहे. या रुग्णांना दर २० दिवसांनी रक्त द्यावे लागते. रुग्णाला रक्त चढविण्यापूर्वी त्याची संपूर्ण चाचणी केली जात असली, तरी विंडो पिरीएडमध्ये एचआयव्ही असल्याचं निष्पन्न होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं रक्त रुग्णांना दिल्यास त्यांना एचआयव्ही संक्रमणाची शक्यता वाढते. असाच काहीसा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. येथील जिल्हा एड्स नियंत्रण कक्षांतर्गत २१ थॅलेसेमियाग्रस्त बालकांची ‘एचआयव्ही’ तपासणी करण्यात आली. त्यापैकी चार बालके एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती याच विभागातील सूत्रांनी दिली. या बालकांनाच नाही, तर इतरही रुग्णांना विंडो पिरीएडमधील एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचं रक्त दिल्यास त्यांनाही एचआयव्ही संक्रमणाचा धोका आहे.काय आहे विंडो पिरीएड!एखाद्या व्यक्तीला ‘एचआयव्ही’ची लागण झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत सर्वसाधारण ‘एलायझा’ नावाच्या तपासणीमध्ये एचआयव्ही असल्याचे निष्पन्न होत नाही. यालाच एचआयव्हीचा ‘विंडो पिरीएड’ म्हणतात.न्यूक्लीड अॅसिड टेस्ट महत्त्वाचीन्यूक्लीड अॅसिड टेस्टच्या (नॅट) माध्यमातून ‘विंडो पिरीएड’मध्ये व्यक्तीला एचआयव्ही असल्याचे निष्पन्न होते; परंतु ही तपासणी महागडी असल्याने मुंबई, पुणे आणि नागपूर वगळल्यास इतर ठिकाणी होत नसल्याची माहिती आहे. साधारणत: एचआयव्ही तपासणीसाठी एलायझा नावाची तपासणी केली जाते. यामध्ये एखादा व्यक्तीला एचआयव्हीची लागण विंडो पिरीएडमध्ये असल्यास ते समोर येत नाही. त्यामुळे अशा रक्तदात्यांकडून एचआयव्ही संक्रमणाची शक्यता वाढते.
संक्रमणातून एचआयव्ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्तदात्याच्या रक्तदानानंतर त्यावर इतर तपासण्यांसोबतच न्यूक्लीड अॅसिड टेस्ट होणे गरजेचे आहे; परंतु ही तपासणी खर्चिक असल्याने ती सर्वत्र उपलब्ध नाही.- डॉ. बाळकृष्ण नामधारी, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, अकोला.