बुलडाणा: खामगाव तालुक्यातील लाखनवाडा व कदमापूर या दोन्ही ग्रामपंचायतीने गावात लग्न ठरल्यावर वधू-वर दोघांसाठी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा ठराव घेतल्यामुळे इतर गावेही समोर येऊ लागली आहेत. मोताळा तालुक्यातील इब्राहीमपूर या ग्रामपंचायानेही अशाच स्वरूपाचा ठराव घेतला आहे. आधी एचआयव्ही चाचणी करा, मगच लग्न अशी चळवळ या निमित्ताने उभी राहत असल्याने बुलडाणा जिल्हा आपले वेगळेपण जपत आहे. इब्राहीमपूर ग्रामंपचायच्या ग्रामसभेत सोमवारी हा ठराव उमेश खोंदले यांनी माडला या ठरावाला योगेश चव्हाण यांनी अनुमोदन दिले व हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सरपंच गोदावरी खोंदले यांनी या ठरावाबाबत सर्व या ग्रामपंचायत आठ सदस्यांचे अभिनंदन करून सकारात्मक कामात अशीच एकजूट कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. या ठरावामुळे गावात लग्न करून येणारी वधू व गावातील नवरदेव यांना लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी एचआयव्ही चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच एचआयव्ही चाचणी केल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतला सादर करावे लागणार आहे. या सभेला सरपंच गोदावरी महादेव खोंदले, उपसरपंच स्वाती अनिल गोंड, सचिव विजय इंगळे तसेच सदस्य कौशल्य शिवशंकर हरामकार, मंदा कैलास हरामकार, कविता ज्ञानदेव हरामकार, सुमनबाई पुंजाजी गायकवाड, रामेश्वर नारायण गायकवाड, कृष्णाबाई तारसिंग मंजा, मनीषा सुनील भांबद्रे उपस्थित होते. मोताळा ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक गजानन लहासे यांनी एचआयव्ही संदर्भातील समज आणि गैरसमज याबाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली.
आधी एचआयव्ही चाचणी, मगच लग्न!
By admin | Published: November 25, 2015 2:05 AM