लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून, जिल्ह्यात २२४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेड येथे उमेदवार शोधताना पॅनलप्रमुखांची दमछाक होत आहे. दुसरीकडे, सर्वात लहान असलेल्या बाळापूर तालुक्यातील मालवाडा ग्रामपंचायतीमध्ये गाव पुढारी सक्रिय झाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदा महाविकास आघाडी उडी घेणार अशी शक्यता होती; मात्र तसे झाले नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतीमध्ये पक्षांना विशेष महत्त्व नसून, गटबाजी करून निवडणूक लढविल्या जाते. प्रत्येक गटात विविध पक्षांचे कार्यकर्ते व पुढाऱ्यांचा समावेश असतो. सध्या गावात राजकीय बैठकांना वेग आला असून, रात्रीच्या सुमारास भेटीगाठी सुरू आहेत. दुसरीकडे, हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे. असे असतानाही गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पॅनलप्रमुखांची दमछाक होत आहे. बाळापूर तालुक्यातील सर्वात लहान असलेल्या मालवाडा ग्रामपंचायतीमध्ये पक्षाचे काही घेणे-देणे नसून, सर्व राजकारण गाव पुढाऱ्यांच्या भोवती फिरते. सध्या गावात राजकीय वातावरण तापले असून, गावपुढारी आपले पॅनल निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र आहे. सध्या उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणे सुरू असून, इच्छुकांची दमछाक होत आहे.