अकोला : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यंदाही पोळा घरीच साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवार, दि. ३ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केला. त्यानुसार पोळा साजरा करण्यासाठी सामूहिकपणे एकत्र जमता येणार नसून, पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा करण्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.
सोमवार, दि. ६ सप्टेंबर रोजी पोळा सण साजरा करण्यात येणार आहे. एकत्र येऊन पोळा सण साजरा करण्यात येतो; मात्र त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव होऊन रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात पोळा सण घरीच साजरा करण्यात येणार आहे. घरीच बैलांची पूजा अर्चना करून पोळा साजरा करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिला. त्यानुसार पोळा साजरा करण्यासाठी सामूहिकपणे एकत्र येता येणार नसून, पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात पोळा घरीच साजरा करण्यात येणार आहे.
असे आहेत निर्बंध अन् निर्देश !
पोळा साजरा करण्यासाठी सामूहिकपणे एकत्र येता येणार नाही.
पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्यासाठी ज्या ठिकणी नागरिक एकत्र येतात अशा ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता १८७३चे कलम १४४अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.
बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढता येणार नाही.
वाद्य, ढोल, ताशे अथवा ध्वनिक्षेपकाच्या कोणत्याही साधन वापरावर पूर्णत: निर्बंध राहील.
बैलांची शर्यत, बक्षीस स्पर्धा, घरोघरी बैलांना घेऊन जाणे इत्यादीवर पूर्णत: निर्बंध राहतील.
आदेशाची ‘यांच्याकडून’ होणार अंमलजावणी !
पोळा घरीच साजरा करण्यासंदर्भात पारीत करण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तसेच ग्रामीण भागासाठी संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.