अकोला : गत वर्षापासून कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने संचारबंदी लागू आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. या पोलिसांवर विविध बंदोबस्ताचा प्रचंड ताण असल्याने अकोला पोलीस दलातील काही अधिकारी त्यांचे छंद जोपासून हा ताण कमी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला शहरासह जिल्ह्यात राज राजेश्वराचा कावड पालखी महोत्सव, गणेशोत्सव, दुर्गा विसर्जन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, चेट्रीचंड, ईद, गोगा नवमी, यासह विविध धार्मिक उत्सव मोठ्या जोमाने साजरे करण्यात येतात. या उत्सवाला कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो. मात्र गतवर्षीपासून कोरोनाचाही कहर सुरू असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण अधिकच वाढला आहे. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांचा छंद जोपासत असल्याचेही दिसून येत आहे. त्यानुसार अकोला पोलीस दलात कार्यरत असलेले शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांना सायकलिंगचा छंद असून ते तब्बल २० ते २५ किलोमीटर सायकल चालवून त्यांचा छंद जोपासत आहेत. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा छंद असून ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच क्रिकेट खेळून ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात. तर वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांना गायनाचा छंद आहे.
स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना वाचनाचा छंद असून ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचन करून ताण कमी करतात.
सायकलिंग करण्याचा छंद शालेय जीवनापासून लागलेला आहे. शाळेत असताना सायकलने ये-जा करावी लागत होती. त्यामुळे अचानकच सायकल चालविण्याचा छंद लागला. आता पोलीस खात्यात संपूर्ण शहराच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना खूप ताण येतो. त्यामुळे रोज सकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा २० ते २५ किलोमीटर सायकल चालवून हा ताण कमी करतो. तसेच त्यामुळे फिटनेस ही उत्तम राहते.
सचिन कदम
शहर पोलीस उपअधीक्षक अकोला
क्रिकेट हा शरीरासाठी सर्वोत्तम खेळ आहे. क्रिकेटमुळे प्रत्येक अवयवाची हालचाल होते. त्यामुळे फिटनेस उत्तम राहते. क्रिकेट खेळत असताना कामाचा ताण संपूर्णपणे विसरला जातो. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस क्रिकेट खेळून ताण कमी करण्याचा प्रयत्न करतो.
विलास पाटील
प्रमुख पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक
लहानपणापासून गायनाचा छंद आहे. पोलीस खात्यात आल्यावर काही काळ छंद जोपासणे जमले नाही. परंतु जेव्हा पोलीस वेलफेयरसाठी ऑर्केस्ट्रा यायचा तेव्हा ह्या कलेला वाव मिळायचा. बऱ्याच वेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले आहे. कोरोनाचे तणावपूर्ण वातावरणात पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत असताना शेवटी पोलीस हा सुद्धा माणूसच असल्याने मानसिक तणाव घालविण्यासाठी संगीत हा एक उत्तम पर्याय आहे.
गजानन शेळके
वाहतूक शाखा प्रमुख
कनिष्ठ महाविद्यालयापासून वाचनाचा छंद लागलेला आहे. वाचन करताना शरीरातील थकवा व डोक्यावरील ताण कमी होतो. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडताना वेळ मिळेल तेव्हा वाचन करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करतो.
नितीन चव्हाण
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला