अकोला: तपासणी अहवालाच्या अधीन राहून उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना मंजूर अनुदानाचा निधी वितरणाचा आदेश तातडीने निर्गमित करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटना जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
२४ फेब्रुवारी २०२० रोजी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणीव्दारे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना १०६ कोटी ७४ लाख ७२ हजार रुपये अनुदानाचा निधी मंजूर करण्यात आला; मात्र अनुदानाचा निधी वितरित करण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप आदेश निर्गमित करण्यात आला नाही. त्यामुळे विनावेतन जीवन जगणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानुषंगाने तपासणीच्या अहवालाच्या अधीन राहून निधी वितरणाचा आदेश तातडीने निर्गमित करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रा.संतोष वाघ, प्रा.मो.फारुक, प्रा.पीयूष तिरुख, प्रा. एम.बी.जाधव, श्रीकांत पळसकार, प्रा. सदानंद बानेरकर, प्रा.हर्षा गवइ, प्रा.नीलिमा वाघमारे, प्रा.पुष्पा पागृत, प्रा.दीपाली भाकरे आदी सहभागी झाले होते.
..............फोटो...........