अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजपानेच हे षडयंत्र रचले आहे, असा आराेप शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. शिंदे यांच्या गाेटातून बुधवारी सुखरूप अकाेल्यात परतल्यावर ते पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. मी निवडून आलो असलो तरी शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे त्यामुळे मी निष्ठावान शिवसैनिक, प्राण असेपर्यंत शिवसेनेशी इमान कायम ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुंबई, सुरत, गुवाहाटी ते नागपूर असा संपूर्ण घटनाक्रम विशद करून आ. देशमुख यांनी हा सगळा प्रकार भाजपानेच घडवून आणल्याचा दावा केला. ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीचे मतदान आटाेपल्यावर एकनाथ शिंदे यांनी मला व कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबीटकर यांना गाडीत घेऊन ठाण्याकडे नेले, गाडी पालघर येथे चहा घेण्यासाठी थांबली. येथे शिवसेना राज्यमंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे आले हाेते. चहा घेताना हा रस्ता कुठे जाताे, अशी चाैकशी केली असता येथून १०० किमीवर गुजरातची सीमा असल्याची माहिती मिळाली अन् त्याचवेळी काहीतरी वेगळे घडत आहे, अशी शंका आल्याचे देशमुख म्हणाले. गाडी गुजरातच्या दिशेने जात असतानाच ट्रॅफिक जाम झाल्यानंतर एक आमदार उतरले अन् पळून गेल्याची माहिती मिळाली. आम्ही सुरतच्या एका आलिशान हाॅटेलमध्ये पाेहचलाे तेव्हा तिथे हाॅटेलला छावणीचे स्वरूप हाेते. माेठा बंदाेबस्त अन् स्वागताला भाजपाचे माेहित कंबाेज व संजय कुटे हे हाेते. त्यांना पाहताच सारा प्रकार समाेर आला, भाजपने शिंदे साहेबांना हाताशी धरून मोठं षडयंत्र रचल्याचं स्पष्ट झालं. तिथूनच बाहेर पडण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे ते म्हणाले.
ताे मी नव्हेच अन् ती सही माझी नाही
एकनाथ शिंदे समर्थकांच्या ठराव पत्रावर सही केल्याचा दावा माध्यमांमध्ये सुरू आहे. सही करतानाची चित्रफीत व्हायरल झाली आहे याबाबत आ. देशमुखांनी सांगितले की त्या पत्रावर सही करणारा मी नाहीच, माझ्यासारखा दुसरा काेणीतरी सही करताना दाखविला असेल, मी नेहमी इंग्रजीत सही करताे मात्र दाखविण्यात आलेली सही ही मराठीत असल्याने ती सही माझी नाही, असा दावा त्यांनी केला.
पळ काढला अन् जबरदस्तीने दवाखान्यात नेले
सुरतच्या हाॅटेलमधून पोलीस बाहेर जाऊ देत नव्हते. त्यांच्याशी वाद झाला व मी तिथून पळ काढला, माझ्या मागे ४० पोलिसांचा ताफा होता. तेथे ए. डी. जैन नावाचं विद्यालय होतं, त्या विद्यालयाचा फाेटाे उद्धव ठाकरे व पीएला पाठिवला ताेपर्यंत माझ्या फोनची बॅटरी संपली होती. हा सारा प्रकार पाेलिसांनी पाहिला व रात्री तीन, साडेतीन वाजता मला गाडी घेण्यासाठी येईल, असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जबरदस्तीनं पकडून लाल रंगाच्या गाडीत टाकले व सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथे पोलीस आणि डॉक्टर जी चर्चा करत होते त्यामधून माझा घातपात होतो की काय, असा संशय आला. एका डॉक्टरनं अटॅक आला असून घाम आल्याचं सांगितलं. २० जणांनी मला पकडलं आणि एका जणानं माझ्या दंडात सुई टोचली. अटॅकच्या निमित्तानं माझा घात करण्याचा डाव होता असा आराेप आ.देशमुख यांनी केला.
गनिमी काव्याने सुटका, पण विमानाचा दाता काेण?
दवाखान्यातून गुवाहाटीला गेलो. तेथून गनिमी काव्याने मी विमानतळ गाठून नागपूर गाठले, असे आ. देशमुख यांनी स्पष्ट केले असले तरी गुवाहाटी ते नागपूरपर्यतच्या प्रवासासाठी चाॅर्टर प्लेनची व्यवस्था काेणी केली, ताे दाता काेण? याचे उत्तर त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले. मंदिरात जसे गुप्त दान केले जाते तशी गुप्त मदत मला मिळाली, एवढेच स्पष्ट करत त्यांनी ही पत्रकार परिषद आटाेपती घेतली.