अकोला : आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाने उत्तर भारत व कोकण-गोव्यासाठी ११२ होळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी काही गाड्या शुक्रवार, ८ मार्चपासूनच सुरु झाल्या आहेत. तथापी, या गाड्यांपैकी एकही विशेष गाडी अकोला मार्गे नसल्याने मध्य रेल्वेकडून अकोला मार्गाची उपेक्षा होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अकोलेकर प्रवाशांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ विभागात येत असलेले अकोला हे प्रवासी व मालवाहतुकीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात महसुल मिळवून देणारे स्थानक आहे. मुंबई-कोलकाता या महत्वाच्या मार्गावर असल्याने या ठिकाणी प्रवाशांची मोठी ये-जा सुरु असते. बहुतेक सर्वच प्रवासी गाड्यांना या ठिकाणी थांबा आहे. तथापी, प्रवाशांच्या सोयी-सुविधेबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून अकोला स्थानकाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.मध्य रेल्वेने घोषित केलेल्या ११२ होळी विशेष गाड्यापैकी अनेक गाड्या मुंबई व पुणे येथून उत्तर भारताकडे जाताना भूसावळपर्यंत येणाऱ्या आहेत. यापैकी काही गाड्यांना सहज अकोलापर्यंत आणने शक्य होते. परंतु या गाड्या भूसावळवरूनच उत्तर भारताकडे वळविण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून प्रवास करावयाचा झाल्यास अकोलेकर प्रवाशांना भूसावळपर्यंत जाणे क्रमप्राप्त आहे. महसुल मिळवून देण्यात अकोला स्थानक कुठेही कमी पडत नसताना येथील प्रवाशांच्या सुविधेकडे लक्ष का दिले जात नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
भूसावळवरून उत्तरेकडे जाणाऱ्या होळी विशेष गाड्या
एलटीटी (मुंबई)- बनारस साप्ताहिक (६ फेऱ्या)एलटीटी (मुंबई)-दानापुर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट (६ फेऱ्या)एलटीटी (मुंबई)-समस्तीपुर साप्ताहिक सुपरफास्ट (४ फेऱ्या)एलटीटी (मुंबई)-प्रयागराज साप्ताहिक सुपरफास्ट एसी स्पेशल (८ फेऱ्या)पुणे-कानपुर साप्ताहिक सुपरफास्ट होळी विशेष (४ फेऱ्या)एलटीटी (मुंबई)-गोरखपुर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (६ फेऱ्या)बई (सीएसएमटी)-गोरखपुर, साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (६ फेऱ्या)पुणे-दानापुर, साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (४ फेऱ्या)