राजेश शेगाेकार, अकोला: महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी अकोला शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. अकाेला शहरातील अशोक वाटिकेत आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली. हजाराे अनुयायांनी युगप्रवर्तक डाॅ.बाबासाहेबांचा जयघोष केला. शहरातील विविध भागात बौध्द विहारांमध्ये सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. तसेच कार्यक्रम आणि उपक्रमांव्दारे बाबासाहेबांना वंदन करण्यात आले.
सकाळी शहरातील अशोक वाटिका येथे सकाळपासूनच भगवान गौतम बुध्द, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्प आणि पुष्पहार अर्पण करण्याासाठी गर्दी उसळली हाेती भारतीय बौध्द महासभेच्यावतीने सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले तसेच समता सैनिक दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून महामानव डाॅ.बाबासाहेब यांना मानवंदना देण्यात आली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांच्यावतीने महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.पुस्तके, प्रतिमांची दुकाने अन् गर्दीने फुलली अशोक वाटिका !
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशोक वाटिका परिसरात महापुरुषांच्या जीवन कार्यावरील विविध पुस्तके तसेच प्रतिमा, मूर्ती व पूजा साहित्याची दुकाने लावण्यात आली होती. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांकडून पुस्तके, प्रतिमा व पूजेचे साहित्य खरेदी करण्यात येत होते. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीने अशोक वाटिका परिसर फुलून गेल्याचे दिसत होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"