पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत ३५ गृहरक्षक दलाचे जवान सद्य:स्थितीत कोरोनाच्या संकटात सेवा बजावत आहेत. जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या गृहरक्षक दलातील जवानांना गेल्या चार महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. सेवा देत असताना घर कसे चालवावे, असा प्रश्न गृहरक्षक दलातील जवानांसमोर उभा राहिला आहे. बंदोबस्त, प्रशिक्षण व प्रशासन अशी तिहेरी भूमिका पार पाडत असताना काळ वगळता सेवेत निमित्त नसते. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध गावांना बंदोबस्तासाठी जाणे, तपासकामी पोलिसांना मदत करणे, दंगल, भांडणे नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना मदत करणे, कोविड-१९ विषाणूसंदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे, आदी कामे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून करीत आहेत. असे असतानाही मानधन न मिळाल्याने हे जवान आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. गृहरक्षक दलातील जवानांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
चार महिन्यांपासून गृहरक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:17 AM