अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून अकोलापोलिस दलाने ऑटोरिक्षा चालकांसाठी सुरु केलेल्या ‘नो मास्क- नो सवारी’या उपक्रमाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली आहे. या उपक्रमास प्रसिद्धी देणादेणारे ‘लोकमत’चे वृत्त ट्विट करीत देशमुख यांनी अकोला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
अकोला शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर रोखण्यासाठी ‘नो मास्क, नो डील’ हा उपक्रम पोलिसांनी सुरू केला असून, त्यातंर्गतच शहरात धावणाऱ्या जवळपास २ हजार ऑटोवर ‘नो मास्क, नो सवारी’चे पोस्टर्स लावण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी पहिले दोन दिवस ऑटोचालकांची शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत सर्व ऑटोचालकांनी स्वत: मास्क घालावे व ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या सवारीलासुद्धा मास्क घालणे बंधनकारक करावे, अशा सूचना केल्या आहेत. सवारी मास्क घालण्यासाठी तयार नसल्यास अशी सवारी ऑटोमध्ये बसवून घेऊ नये, या माध्यमातून स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ऑटोचालकांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम मोडणाºया ऑटोवर कारवाई करण्यात येणार आहे.पोलिसांच्या या उपक्रमाबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २७ सप्टेंबर रोजी सचित्र प्रकाशीत केले. राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या टिष्ट्वटर हँडलवर ‘लोकमत’चे हे वृत्त ट्विट करीत अकोला पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी अकोला पोलिस राबवित असलेली ही मोहिम कौतुकास्पद असल्याचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. खुद्द गृहमंत्र्यांकडून कौतुकाची थाप मिळाल्याने अकोला पोलिसांचा उत्साह वाढला आहे.