अकोला : कोरोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ रुग्णांवर ‘वाॅच ’ ठेवण्याची मोहीम महसूल, महानगरपालिका व पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने अकोला शहरात सुरू केली. त्यामध्ये सोमवारी शहरातील विविध भागात कोरोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ ५७ रुग्णांच्या घरी जाऊन, तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित कोरोनाबाधीत ‘होमक्वारंटाइन’ रुग्ण घरातच असल्याचे आढळून आले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता, कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ रुग्ण बाहेर फिरल्याने कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी अकोला शहरातील कोरोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात लक्ष (वाॅच) ठेवून तपासणी करण्याची मोहीम महसूल, मनपा व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने सुरू केली आहे. त्यामध्ये सोमवार, दि.२२ मार्च रोजी अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व मनपा उपायुक्त पंकज जावळे यांच्या नेतृत्वातील संयुक्त पथकाने शहरातील विविध भागांत कोरोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ असलेल्या ५७ रुग्णांच्या घरी जाऊन रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यात आली. या तपासणीत संबंधित होमक्वारंटाइन रुग्ण घरीच असल्याचे आढळून आले. करोनाबाधित ‘होमक्वारंटाइन’ रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात दररोज प्रशासनाच्या पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
बाहेर फिरणाऱ्या ‘होमक्वारंटाइन’ रुग्णांवर गुन्हे दाखल करणार !
अकोला शहरात कोरोनाबाधीत ‘होमक्वारंटाइन’ रुग्ण घरातच आहेत की नाही, यासंदर्भात तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी ‘होमक्वारंटाइन’ ५७ रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली असता, संबंधित होमक्वारंटाइन रुग्ण घरीच असल्याचे आढळले. ही मोहीम दररोज राबविण्यात येणार असून, तपासणीत होमक्वारंटाइन रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास संबंधित रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ.नीलेश अपार यांनी सांगितले.