अकाेला : अकाेल्यात कोरोनाचे संक्रमण अनियंत्रित झाले आहे. त्यामुळे तो नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनातर्फे आणखी कडक पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गत औषधांची दुकाने सोडून अत्यावश्यक सेवेत येणारी किराणा, डेअरी, भाजीपाल्यासह चिकन, मटण, मासे विक्रीची व इतर वस्तूंची दुकानेही आता सकाळी ११ पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे सुधारित आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले हाेते. त्याची काटकाेर अमंलबजावणी बुधवारी सकाळी झाली. ११ चा ठाेका पडण्याच्या आत अवघ्या दहा मिनिटात बाजारपेठ बंद करण्यात आली. त्यामुळे सकाळीच घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी अकराच्या आत घर जवळ केल्याचे दिसून आले.
व्यापाऱ्यांनीही दिला प्रतिसाद
शहरातील मुख्य जनता बाजारासह, अनेक चाैकात भरणाऱ्या बाजारांमध्ये सकाळीच नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली हाेती. मात्र राेजच्या तुलनेत ही गर्दी कमीच हाेती. सकाळी अकराच्या आत भाजी विक्रेत्यांनीही विक्री बंद करण्यास सुरवात केल्याने ११ च्या आत सर्व बंद या नियमाची अमंलबजावणी करणे सुलभ झाले.
विनाकारण फिरणाऱ्यांवर वाॅच
औषध खरेदी, दवाखान्याच्या नावावर प्रिस्किप्शनचे कागद घेऊन बाहेर पडणाऱ्या रिकामटेकड्या नागरिकांची संख्या बुधवारी राेडावल्याचे दिसून आले. सकाळी ११ नंतर बाहेर पडणाऱ्यांची पाेलिसांनी चाैकाचाैकात अडवणूक करून चाैकशी सुरू केल्याचे फाेटाे समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने रिकामटेकड्यांनी पाेलिसांची धास्ती घेतल्याचे दिसून आले.
एसपी रस्त्यावर कारवाई कडक
जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी शहरातील राणी सती मंदिर रोड, गांधी चौक, सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक तसेच जठारपेठ चौक या परिसरात स्वत: उपस्थित राहून कारवाई केली, या कारवाईमध्ये अंदाजे एक हजाराच्या वर दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली असून संबंधित वाहनधारकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांच्यासह इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.