संजय खांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मागील ३० वर्षांपासून सोन्याच्या दागिन्यांवर बारीक नक्षीकाम करणाऱ्या २०० बंगाली कारागिरांनी रोजगाराअभावी अकोल्याचा सराफा बाजार कायमचा सोडला. बाजारपेठेतील मंदीचा हा परिणाम असून, काहींनी तर परंपरागत सराफा व्यवसाय सोडून इतर उद्योग-व्यवसाय निवडल्याचे या बाजारातील विदारक चित्र आहे.
नोटबंदीपाठोपाठ जीएसटीची सक्ती लादल्याने बाजारपेठेतील अनेक उद्योग अडचणीत सापडले. ते अजूनही रुळावर आलेले नाहीत. सोन्याच्या भावाची झळाळी उंचावर कायम दिसत असली तरी पूर्वीप्रमाणे सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी नाही. दागिने खरेदीचा निर्णय हा अतिरिक्त रक्कम आणि शुभकार्याशिवाय नसतो. ट्रेडिंग करणारा मोठा वर्ग बाजारपेठेतून केव्हाच बाहेर पडला. सर्वसामान्यांच्या खिशात खेळता पैसा नसल्याने त्यांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरविली गेली. तेव्हापासून आलेली अवकळा सराफावर अजून कायम आहे.
उठाव नसल्याने मोठमोठ्या नामांकित ज्वेलर्स, शो रूम्समधील कामगारांची संख्या रोडावली. अतिरिक्त खर्चांवर अंकुश सुरू झाल्याने अनेकांना रोजगार गमवावा लागला. त्यात सर्वात मोठा फटका अकोल्यात ३० वर्षांपासून कायम असलेल्या बंगाली कारागिरांना बसला. सराफा बाजाराच्या अवतीभोवती भाड्याने खोल्या घेऊन राहणाºया कारागिरांना नियमित रोजगार मिळेनासे झाले. या सुवर्ण कारागिरांनी अकोल्यातून पुन्हा कोलकाताकडील मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. कारागिरांनी अकोला सोडल्याने भाड्याने खोल्या देणाऱ्यांनादेखील याची झळ बसली आहे. ४०-५० बंगाली सुवर्ण कारागिरांनी आता गुलाबजामून विक्रीचा आणि पाणीपुरीचा व्यवसाय टाकला आहे.
मागील २० वर्षांपासून सराफा बाजारात आम्ही सुवर्ण कारागीर म्हणून काम करीत आहोत. एवढी मंदी या आधी कधी जाणवली नाही. २००च्या वर बंगाली कारागीर सोबती शहर सोडून गावाकडे गेले आहेत.- राजू बंगाली, अकोला.