यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर इत्यादी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने पीक नुकसानाचे पंचनामे करून, जिल्ह्यातील ७२ हजार ४७५ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ५१ कोटी ५७ लाख ४८ हजार रुपये मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतनिधीतून २४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त उर्वरित ३४ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेला २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे मदतनिधी केव्हा प्राप्त होणार आणि पीक नुकसान भरपाईच्या मदतीचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत मदतीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ३४ हजार २१ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
मदत वाटपाचे असे आहे वास्तव!
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी: ७२,४७५
मदत निधीची एकूण मागणी : ५१ कोटी ३८ लाख ६८ हजार रुपये.
प्राप्त मदतनिधी : २५ कोटी ७८ लाख ७४ हजार रुपये.
मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी: ३८ हजार ४५४
खात्यात जमा केलेली रक्कम : २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपये.
मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी: ३४ हजार ०२१
अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त मदतनिधीतून ३८ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. शासनाकडून दुसऱ्या टप्प्यातील मदत निधी उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
संजय खडसे
निवासी उप-जिल्हाधिकारी.