अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नदी व नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात घरांची पडझड, तसेच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच नदी व नाल्याकाठची जमीन पुरामुळे खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाच्या २४ जुलैच्या प्राथमिक अहवालानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये २ लाख २४ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु पिकांसह शेतीच्या नुकसानभरपाईची मदत अद्याप शासनामार्फत जाहीर करण्यात आली नाही. त्या अनुषंगाने पिकांसह शेतजमीन नुकसानीच्या भरपाईची मदत शासनाकडून केव्हा जाहीर होणार आणि नुकसानीची मदत हेक्टरी किती मिळणार, याबाबतची प्रतीक्षा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
प्राथमिक अहवालानुसार अमरावती
विभागात असे आहे पिकांचे नुकसान !
जिल्हा क्षेत्र ( हेक्टर)
अकोला ५४०००
अमरावती १७६७४
यवतमाळ ९५९९
वाशिम ३१३३
बुलडाणा १७५
........................................................
एकूण ८४५८१
नुकसानीचे पंचनामे सुरू !
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे, तसेच खरडून गेलेल्या शेतजमीन नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पिकांसह शेतीच्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
२४ जुलै रोजीच्या प्राथमिक अहवालानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ८४ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिके व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पिकांसह शेतीच्या नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
शंकर तोटावार
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.