नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे अकाेल्यात काँग्रेसमध्ये बदलाच्या आशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 06:48 PM2021-02-07T18:48:23+5:302021-02-07T18:48:30+5:30

Congress State President News काँग्रेसने प्रदेशस्तरावर नव्या दमाचे नेतृत्व दिले असून, प्रदेश कार्यकारिणीतही सत्तेचे विकेंद्रीकरण केले आहे.

Hopes for change in Akola Congress soon due to new state president! | नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे अकाेल्यात काँग्रेसमध्ये बदलाच्या आशा!

नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे अकाेल्यात काँग्रेसमध्ये बदलाच्या आशा!

Next

अकोला : भाकरी का करपली, पाने का सडली, घोडा का अडला, या सर्व प्रश्नांना उत्तर एकच ते म्हणजे न फिरविल्याने. या लहानशा बोधकथेतून बोध घेत अनेकदा राजकीय पक्ष नेतृत्वाची भाकरी फिरवितात. मात्र, ती भाकरी फिरविणे म्हणजे जुन्याचे नवे करणे किंवा ताटातले वाटीत अन् वाटीतले ताटात करणे असेच असते. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये साधारणपणे असेच चित्र अनेकदा दिसून आले आहे. यावेळी मात्र नाना पटाेले यांच्या रूपाने काँग्रेसने प्रदेशस्तरावर नव्या दमाचे नेतृत्व दिले असून, प्रदेश कार्यकारिणीतही सत्तेचे विकेंद्रीकरण केले आहे. त्यामुळे अकाेल्यातील काँग्रेसजनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्या लाेकसभा निवडणुकीपूर्वीपासून अकाेला जिल्हा व महानगर काँग्रेसच्या कार्यकारिणीत बदल हाेणार आहेत, अशा वावड्या उठत हाेत्या. मात्र, काँग्रेसने कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये मरगळ आल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत प्रचंड उत्साह निर्माण झाला हाेता. मात्र, अल्पावधीतच काँग्रेसचा उत्साह मावळलेला दिसला. राष्ट्रवादीला अमाेल मिटकरी यांच्या रूपाने आमदार मिळाला, तर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमकपणे सत्तेचे फायदे मतदारसंघासाठी पाेहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला. यामध्ये काँग्रेस खूपच मागे राहिल्याचे दिसत आहे. पालकमंत्र्यांच्या संमतीने जिल्हास्तरावर केल्या जाणाऱ्या शासकीय व निमशासकीय समित्यांचेही वाटप झालेले नसल्याने काँग्रेसच्या सामान्य पदाधिकाऱ्यांपर्यंत सत्तेचा वाटा आला नाहीच. दुसरीकडे पक्षाकडून आलेले कार्यक्रम व आंदाेलनापलीकडे अकाेल्यातील काँग्रेसने आपले अस्तित्व दर्शविले नाही. त्यामुळेच जिल्हा व महानगर काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याची मागणी अनेक नेत्यांनी प्रदेश कार्यकारिणीपर्यंत पाेहोचविली आहे. मात्र, प्रदेशस्तरावरच अस्थिरता असल्याने या मागणीची दखल घेतली गेली नाही. आता नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त झाले आहेत. त्यांना अकाेल्यातील राजकारणाची जाण आहे. विशेष म्हणजे भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम अकाेल्यातच झाला हाेता, तसेच यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील आंदाेलनातही नाना पटाेले सक्रिय हाेते. त्यामुळे नव्या बदलाची काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पक्षात जिल्हाध्यक्षपदासाठी अविनाश देशमुख, प्रकाश तायडे, अशोक अमानकर, प्रशांत गावंडे, डॉ. अभय पाटील, डॉ. पुरुषोत्तम दातकर, डॉ. सुधीर ढोणे, हेमंत देशमुख यांची नावे शर्यतीत आहेत, तर महानगर अध्यक्षपदासाठी प्रदीप वखारिया, नितीन ताकवाले, साजीद खान पठाण, कपिल रावदेव, अविनाश देशमुख, डाॅ. जिशान हुसेन यांच्या नावांची चर्चा आहे.

शेतकरी आंदाेलनात काँग्रेसचे नेते सक्रिय

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातही शेतकऱ्यांना जागृत करून आंदाेलन उभारण्यात काँग्रेसचे नेते सक्रिय राहिले. या नेत्यांनी शेतकरी जागर मंच, किसान विकास मंचच्या माध्यमातून अधिक सक्रिय लढा दिल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांना साेबत घेऊन चालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने दिसून आला. किसान विकास मंचने, तर थेट दिल्लीपर्यंत धडक दिली. त्यामुळे काँग्रेसमधील फेरबदल झाल्यास पक्षातील मरगळ दूर हाेण्याचे संकेतही अशा आंदाेलनातून समाेर आले आहेत.

Web Title: Hopes for change in Akola Congress soon due to new state president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.