अकोला: दिवाळीत फटाके उडवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत; मात्र अकोल्याच्या बाजारात फटाक्यांची विक्री धडाक्यात सुरू असून, प्रदूषण कमी करणारे हरित फटाके बाजारात उपलब्धच नसल्याने, फटाके उडवण्यावर निर्बंधांच्या अंमलबजावणीची आशा मावळली आहे.दिवाळीच्या कालावधीत फटाके उडवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार दिवाळीच्या दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडता येणार असून, रात्री १० वाजतानंतर फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले. दिवाळीच्या पर्वावर अकोल्यातील बाजारात फटाक्यांची ठोक विक्री धडाक्यात सुरू झाली आहे. प्रदूषण कमी करणारे हरित फटाके दुकानांमध्ये अद्याप उपलब्ध झाले नसल्याने, प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचीच विक्री होणार आहे. त्यामुळे दिवाळीत फटाके उडवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले असले तरी, या निर्बंधाची अंमलबजावणी होण्याची आशा मात्र मावळण्यातच जमा असल्याची स्थिती आहे.फटाके विक्रीतून अकोल्यात होते दोन कोटींवर उलाढाल!दिवाळीत फटाके विक्रीच्या व्यवसायातून अकोला शहरात दरवर्षी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होते. त्यानुषंगाने यंदाच्या दिवाळीतही शहरात फटाके विक्रीच्या व्यवसायातून दोन रुपयांच्यावर उलाढाल होण्याचा अंदाज आहे.विक्रीवर होणार नाही परिणाम!दिवाळीत रात्री १० वाजतानंतर फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले असले तरी, त्यामुळे फटाके विक्रीवर तसेच फटाके विक्रीच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही, असे फटाके विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.शहरात अशी होते फटाक्यांची विक्री!अकोला शहरात फटाके विक्रीची २५ ठोक दुकाने (होल सेलर) असून, अकोला क्रिकेट क्लब मैदानावर लागणाºया ७० ते ८० दुकानांमधून फटाक्यांची किरकोळ विक्री केली जाते. तसेच शहरातील बाजारपेठ परिसरात रस्त्यांवर २५० ते ३०० हातगाड्यांवरही फटाक्यांची किरकोळ विक्री केली जाते.