मूर्तिजापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकरी बागायतीकडे वळले असून, यंदा तालुक्यात १,२१३ हेक्टर क्षेत्रावर बागायती शेती असून, यामध्ये फळबाग, भाजीपाला वर्गीय पिकांची पेरणी केली आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा व कांदा याप्रमुख पिकांची पेरणी सुरू असून, यंदा हरभऱ्याचे क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे.
खरिप हंगातील झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरून निघण्याची शेतकऱ्यांना आशा असली तरी असले तरी तूर पिकावर परिपक्व होण्याआधीच एकाएकी अज्ञात रोगाचे संकट आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही तद्वतच हरभरा पीक हातात यायचे आहे.
यंदा सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात होता. पैशांची जुळवाजुळव करून यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी सुरू केली. परतीच्या पावसामुळे पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी करून हरभऱ्याची पेरणी केल्याची चित्र आहे. रब्बी हंगामात यंदा २३ हजार ४५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. सद्य:स्थितीत शेतात रब्बी हंगामातील पिके डोलत असल्याचे चित्र आहे. (फोटो)
---------------
वन्यप्राण्यांचा हैदोस
तालुक्यातील रब्बी पेरणी आटोपली असून, पिके शेतात डोलू लागली आहे. रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पिकात शिरून नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
--------------------------------------