आलेगाव : पातूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी फळबागेची लागवड केली आहे; मात्र त्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी मानवी हक्क अभियान संघटनेने तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांना दि.१४ जुलैला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मानवी हक्क अभियान संघटनेेने दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागेची लागवड केली असून, अनुदानापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी फायली कृषी सहायकाकडे दिल्या असून, कार्यवाही झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कार्यालयाशी संपर्क केला असता कृषी कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. शेतकरी आर्थिक संकटात असून, शेतकऱ्यांना त्वरित फळबाग लागवडीचे अनुदान द्यावे, अशी मागणी कृषी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी मानवी हक्क अभियान संघटनेचे प्रदेश संघटक गजानन वानखडे, महिला आघाडीचे अध्यक्ष ज्योतीताई दाभाडे, आलेगाव तालुका संघटक राहुल धाडसे, मनोहर कांबळे, आदी उपस्थित होते.
------------------------
...अन्यथा आंदोलन
कोरोनाकाळात संकटात सापडलेला शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित फळबाग लागवडीचे अनुदान द्यावे, अन्यथा मानवी हक्क अभियान संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदेश संघटक गजानन वानखडे यांनी निवेदनातून दिला आहे.