कोरोनावरील उपचारात रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरले आहे. त्या अनुषंगाने हाफकिन खरेदी कक्षामार्फत पुरवठा आदेशानुसार, कॅडिला हेल्थ केअर लि. कंपनीमार्फत रुग्णालयांना रेमडेसिविर १०० एमजी इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला होता. यामध्ये समूह क्रमांक एल १००१४८, निर्मिती एप्रिल २०२१ मधील रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरानंतर अमरावती जिल्ह्यातील काही रुग्णांना गंभीर परिणामांना सामोर जावे लागल्याची माहिती सुत्रांनी दिली. या घटनेनंतर या समूह क्रमांकातील रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबविण्याच्या सूचना आरोग्य सेवा आयुक्तालय खरेदी कक्षामार्फत पत्राद्वारे राज्यातील रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनचा संबंधीत समूह क्रमांकाबाबत काही अडचणी असल्या, तरी इतर रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे शक्य आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला