शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स, हाॅटेल्स, रेस्टॉरंटच्या माध्यमातून वर्षाकाठी माेठी आर्थिक उलाढाल केली जाते. अशाठिकाणी निर्माण हाेणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकांवर आहे. अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. इमारतींची उभारणी करताना अग्निशमन यंत्रणा, वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. यामुळे दुर्घटना घडल्यास जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी पाहता राष्ट्रीय हरित लवादाने यासंदर्भात आदेश जारी केला असून, निकषांची पूर्तता न करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानला सील लावण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी नगररचना विभाग, बाजार व परवाना, जलप्रदाय, अग्निशमन, आरोग्य विभाग व अतिक्रमण विभागाने संयुक्तरीत्या कारवाई केली.
याठिकाणी केली कारवाई
जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांच्या आदेशानुसार जठारपेठ येथील हाॅटेल शगुन, उत्सव मंगल कार्यालय, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, लहान उमरी येथील अभिरुची फॅमिली गार्डन लॉन, जठारपेठ चौक येथील रत्नम लॉन्स यांचा समावेश आहे.