शहरातील काही मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्समध्ये वर्षभर लग्न साेहळ्यांसह विविध कार्यक्रम पार पडतात. यादरम्यान, वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. कार्यक्रमादरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजेचा वापर केला जाताे. उष्टे अन्न सर्व्हिस लाइनमध्ये उघड्यावर फेकून दिले जाते. सांडपाण्याचा याेग्यरीत्या निचरा केला जात नाही. हाॅटेल, मंगल कार्यालयात अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे दिसून येते. एकूणच, या सर्व प्रकाराचा स्थानिक रहिवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागताे. यासंदर्भात महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही याेग्य दखल घेतली जात नसल्याने थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली. त्या अनुषंगाने लवादाने निकषांची पूर्तता न करणाऱ्या मंगल कार्यालयांसह हाॅटेल, लाॅन्स व रेस्टाॅरन्टला सील लावण्याचा आदेश जारी केला. लवादाच्या आदेशाचे पालन करीत मनपा प्रशासनाने या सर्व प्रतिष्ठानला सील लावण्याची माेहीम सुरू केली आहे. यामुळे व्यावसायिकांसह लग्न साेहळ्यांचे आयाेजन करणाऱ्यांसमाेर धर्मसंकट उभे ठाकले आहे.
लवादाच्या आदेशानंतरच कारवाई का?
मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्स संचालकांना व्यवसायासाठी अनेक निकषांची पूर्तता करणे भाग आहे. हरित लवादाच्या आदेशानंतरच मनपाला कारवाईसाठी जाग आल्याने प्रशासनाच्या धाेरणात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित झाली आहेत. अर्थात, व्यवसायासाठी परवाना देऊन प्रशासन नामानिराळे हाेत असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.
शपथपत्र घेणार कधी?
मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्सला सील लावल्यानंतर ते नेमके उघडणार कधी, असा सवाल उपस्थित हाेत आहे. मनपाच्या भूमिकेमुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे प्रशासन शपथपत्र लिहून घेणार असले तरी कधी, याकडे लक्ष लागले आहे.