संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे.‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यासाठी बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची शेतजमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली. भाड्याने घेतलेल्या २.३६ आर. जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यात आला; परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लान्ट सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे विनापरवाना ‘हॉटमिक्स प्लान्ट’ उभारण्यात आल्याचे वृत्त गत ६ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत, विनापरवाना उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लान्टची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना गत ६ जानेवारी रोजी दिला होता. त्यानुषंगाने यासंदर्भात महसूल मंडळ अधिकार्यांमार्फत चौकशी करून, चौकशीचा अहवाल अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. चौकशी अहवालाच्या आधारे अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्या संबंधित कंपनीसह शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी ९ फेब्रुवारी रोजी दिला. दंडाची रक्कम १५ दिवसांत संबंधित कंपनीसह शेतमालकाने संयुक्तरीत्या जमा करावयाची आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अकृषक परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालानुसार अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्या कंपनीसह संबंधित शेतमालकास संयुक्तरीत्या २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला आहे.- संजय खडसे उपविभागीय अधिकारी, अकोला.