लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून, चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकार्यांकडे (एसडीओ) सादर करण्यात आला आहे. प्राप्त चौकशी अहवालाच्या आधारे उपविभागीय अधिकार्यांकडून दंडात्मक कारवाईचा आदेश लवकरच देण्यात येणार आहे.बोरगाव मंजू येथे ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यासाठी बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची जमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली. भाड्याने घेतलेल्या २.३६ आर. जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यात आला; परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लान्ट सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे विनापरवाना उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लान्टची सविस्तर चौकशी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना गत ६ जानेवारी रोजी दिला होता. त्यानुषंगाने यासंदर्भात महसूल मंडळ अधिकार्यांमार्फत चौकशी पूर्ण करण्यात आली असून, चौकशीचा अहवाल अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. चौकशी अहवालाच्या आधारे अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्या संबंधित कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाईचा आदेश उपविभागीय अधिकार्यांकडून लवकरच देण्यात येणार आहे.
अकृषक परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालानुसार कारवाईचा आदेश लवकरच देण्यात येईल.- संजय खडसे उपविभागीय अधिकारी, अकोला.