अकोट : विदर्भातील कॉटन बेल्ट अशी ओळख असलेल्या अकोट बाजार समितीत कापसाच्या खरेदीसाठी वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात आवक वाढत असल्याने सीसीआय ग्रेडरची संख्या वाढण्याची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत अंदाजे अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांच्या घराच अजूनही कापसाच्या गंजी लागल्या असून, आर्थिक अडचणीमुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी थंडीत कुडकुडत रात्र काढत आहेत.
कपाशीला सोन्याची झळाळी आली असून, कापसाच्या खरेदी-विक्री करण्यासाठी गत दोन दिवसांपासून अकोट बाजार समितीत कापसाच्या गाड्यांनी परिसर व्यापला आहे. अनेक शेतकरी थंडीत कुडकुडत रात्र बाजार समितीत काढत आहेत. आधीच सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरील दोन्ही ग्रेडर कोरोना पाॅझिटिव्ह आलेहोते. त्यामुळे पर्यायी ग्रेडरची व व्यवस्था न करता कापूस खरेदीच बंद ठेवली होती. पुन्हा कापूस खरेदी सुरू होताच मोठी आवक वाढली आहे. सीसीआयचा हमीदर ५,८२५-५,५१५ रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी थेट सीसीआयला कापूस विक्री करण्याची घाई करत आहे. शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा जमा झाला आहे. बाजार समितीने दररोज सहा हजार क्विंटल कापूस खरेदी करण्याची मर्यादित क्षमता ठेवली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून कापूस खरेदी करता बोलावण्यात येणार असल्याचे ही नियोजन केले आहे, परंतु योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसावी त्यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकट व कोरोना काळ असल्याने आर्थिक चणचण भासत आहे. विशेष म्हणजे कापूस घरात जास्त दिवस राहिल्यास काळवंडलेला होऊन त्याचा दर्जा कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे बाजार समितीने व सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीचे व मोठ्या प्रमाणात होणारी आवक लक्षात घेता लवकरात लवकर खरेदी करण्याकरिता योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
...................................
सीसीआयने ग्रेडरची संख्या वाढवावी
कापूस खरेदीवर मर्यादित क्षमता आणल्याने खुल्या बाजारात कापूस उत्पादन शेतकऱ्यांची लूट करीत पट्ट्या तोडणारे दलालाच्या नफाखोरीला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीसीआयने आपल्या ग्रेडरची संख्या वाढवून शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी करावा, अशी मागणीही पुढे येत आहे.