जिल्ह्यात पुन्हा वाढली थंडी
अकोला: मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात बदल दिसून आला होता. दोन दिवसांपूर्वी उन्हाचा पारादेखील वाढला होता; मात्र बुधवारपासून जिल्ह्यात पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवू लागल्या आहेत. अनेकांना सर्दी, खोकल्यासह ताप येण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत कुठलाही आजार अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
भिरडवाडी परिसरात पाण्याचा अपव्यय
अकोला: जुने शहरातील भिरडवाडी परिसरात जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आठवड्यातून एकदा दिसून येते. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर वाहत असल्याने रस्त्यावरच डबके साचते. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होतो. असाच प्रकार तापडिया नगरातदेखील होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पोस्ट कोविड रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी
अकोला: कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना कोरोनाचे लक्षणे आढळल्यास त्यांनी वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. अशा रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात पोस्ट कोविड वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या वॉर्डात रुग्णांनी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
मुख्य रस्त्यावरच वाहनांची पार्किंग
अकोला: शहरातील गांधी रोड हा मुख्य बाजारपेठेतील रस्ता असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बाजारपेठेत पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने नागरिक मुख्य रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग केली जात आहे. त्यामुळे गांधी चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. चौकात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी असूनही ही स्थिती कायम राहते. बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.