आकोट (अकोला): अकोला जिल्ह्यातील आकोट येथील एका बारावीच्या विद्यार्थिनीची निर्घृण ह त्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. मृतक विद्यार्थिनीचे नाव शुभांगी अरविंद तेलगोटे (१७) असून, याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. अकोला जिल्ह्यातील आकोट येथील देशमुख प्लॉट-जेतवननगर परिसरातील रहिवासी, इलेक्ट्रिशियन अरविंद तेलगोटे यांची मोठी मुलगी शुभांगी ही शुक्रवारी शाळेतून घरी आल्यानंतर काही वेळाने शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर गेली. बराच वेळ होऊनही, ती परत न आल्यामुळे तिची आई शोधायला गेली असता, ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार आढळून आले, तर रक्ताचे थारोळे दोन ठिकाणी साचल्याचे दिसले. तिला तातडीने रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार कैलास नागरे यांनी घटनास्थळावर पाहोचून, तपास सुरू केला. आरोपींबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. शुभांगीच्या बहिणी, आई-वडील तसेच परिसरातील नागरिकांकडूनही त्यांनी माहि ती गोळा केली. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वानाने आरोपींचा माग घेत, आकोट रेल्वे स्टेशनपर्यंतचा भाग दाखविला. या प्रकरणी ४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. घटनास्थळी एक मोबाइल फोन आढळून आल्याची माहिती असून, त्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. उत्तरित तपासणीकरिता शुभांगीचा मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक मीणा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी भेट दिली.
बारावीच्या विद्यार्थिनीचा खून
By admin | Published: October 10, 2014 11:09 PM