मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विमा कोणत्या निकषांच्या आधारे नाकारला? याबाबत कंपन्यांना जाब विचारून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
गेल्यावर्षी सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यात अकाली पावसाने प्रचंड नुकसान केले होते. अशी वस्तुस्थिती मांडणाऱ्या या निवेदनातून पीक विमा मोठ्या प्रमाणात मिळण्याची अपेक्षा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु, विमा कंपन्यांची शेतकऱ्यांविषयीची अनास्था नडली. त्यांनी अकोला जिल्ह्यातील ५२पैकी ५१ महसूल मंडलात नुकसानभरपाई नाकारली असून, ती कोणत्या निकषांच्या आधारे नाकारली? असा प्रश्न या निवेदनातून करून तसा अहवाल या कंपन्यांकडून घ्यावा व कंपन्यांना त्वरित निर्देश द्यावेत. सोयाबीन नुकसानभरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.