लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा कहर नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यामध्ये कपड्यांना इस्त्री करण्याच्या व्यवसायातून आता दररोज केवळ ७० ते १०० रुपयांची कमाई होत असल्याने, या कमाईतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार तरी कसा, अशी व्यथा अकोल्यातील इस्त्री व्यावसायिक नरेश बुंदेले यांनी सोमवारी मांडली.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सकाळी ११ वाजल्यानंतर दुकाने सुरु ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संकटात सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यात वेगवेगळ्या लघु व्यवसायांतून मिळणारी कमाई कमी झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, याची चिंता व्यावसायिकांना सतावत आहे. लाॅकडाऊनचा मोठा फटका या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. कोरोना संकट काळात कडक निर्बंध लागू होण्यापूर्वी इस्त्री व्यवसायातून दररोज ५०० ते ६०० रुपयांची कमाई होत होती; आता मात्र दररोज केवळ ७० ते १०० रुपयांची कमाई होत आहे. या मिळणाऱ्या अत्यल्प कमाईतून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, दुकानाचे भाडे कसे भरायचे, याबाबतची चिंता अकोला शहरातील अकोट फैलमधील इस्त्री व्यावसायिक नरेश बुंदेले यांनी व्यक्त केली.
इस्त्रीच्या व्यवसायातून यापूर्वी दररोज ५०० ते ६०० रुपयांची कमाई व्हायची. आता कोरोना काळात मात्र रोजची ७० ते १०० रुपयांची कमाई होत आहे. त्यामधून कोळसा खरेदी, दुकानभाडे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. दैनंदिन कमाई कमी झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
- नरेश बुंदेले
इस्त्री व्यावसायिक, अकोट फैल, अकोला.
........................फोटो......................