अकोला : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी पीक विमा मिळावा म्हणून नुकसानीचे दावे सादर करत आहेत, परंतु यासाठी असलेल्या मोबाईल ॲपच्या तांत्रिक अडचणीमुळे दावे विहीत मुदतीत सादर होत नसल्याच्या तक्रारी बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अशाच अडचणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांना येत असल्यामुळे दाव्यांअभावी विम्याची रक्कम मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नैसर्गिक आपत्ती व रोगराईमुळे पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी,यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे छत्र घेतले. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रीमिअमची रक्कम भरून आपल्या पिकांसाठी विम्याचे संरक्षण घेतले आहे. गत दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता यावर्षी तुलनेने कमी शेतकऱ्यांनी विम्याचे कवच घेतले आहे. गत आठवड्यात ढगफुटीसदृश पावसामुळे नदी नाल्यांना आलेला पूर व शेतात साचलेल्या पाण्यामुळे तब्बल ५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक विमा मिळावा म्हणून आता शेतकऱ्यांची दावे दाखल करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. यासाठी 'क्रॉप इन्शुरन्स' मोबाईल ॲपवर झालेल्या नुकसानीची माहिती अपलोड करावी लागते. नुकसान झाल्याच्या ७२ तासांत छायाचित्र व इतर माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. परंतु, हजारो शेतकरी एकाचवेळी लॉगइन हाेत असल्याने सर्व्हरची गती मंद झाली आहे. परिणामी माहिती भरण्यात अडचणी येत आहेत. संपूर्ण माहिती भरल्यानंतर अंतिम 'क्लेम' सादर होत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
ओटीपी मिळताे पण दावा सबमिट होत नाही
नुकसानीची माहिती भरण्यासाठी मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्याचा मोबाईल व आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या ॲपद्वारे नुकसानीचे दावे सादर करणे बंधनकारक आहे. ॲप उघडण्यासाठी आधी ओटीपी टाकावा लागतो. अनेकदा ओटीपी लवकर मिळत नाही. एकदा ओटीपी मिळाल्यानंतर पुढील माहिती भरणे सोपे आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर मात्र शेवटच्या टप्प्यात ही माहिती सादरच होत नसल्याचे खिरपुरी येथील एका शेतकऱ्याने सांगितले.
विमा कंपनीच्या समन्वयकाचा फोनही लागेना
पीक विम्यासाठी जिल्ह्यासाठी नियोजित असलेल्या विमा कंपनीने तालुकानिहाय प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. तसेच जिल्ह्यासाठी एक समन्वयक आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे त्यांच्याकडून निराकरण होणे अपेक्षित आहे; परंतु त्यांच्याशी संपर्कच होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हजारो शेतकरी एकाचवेळी लॉगईन हाेत असल्याने ॲपची गती मंदावली आहे. क्लेम सादर न झालेल्या शेतकऱ्यांनी तालुक्याचे कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा. नुकसान झालेले शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाहीत.
- डॉ. कांताप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.
मी १४ एकरावरील पिकाचा विमा काढला आहे. पावसामुळे माझ्या शेतातील पीक खरवडून गेल्यामुळे मी ॲपवर नुकसानीची माहिती अपलोड केली. परंतु, तांत्रिक कारणामुळे अपलोड झालेली माहिती सबमिट होत नाही. गत तीन दिवसांत मी अनेकदा प्रयत्न केले, परंतु क्लेम सादर झालाच नाही.
- नीलेश रामकृष्ण भिरड, शेतकरी, खिरपुरी
पिकाचे नुकसान झाल्यामुळे मी ॲपद्वारे माहिती अपलोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आधी ओटीपी येत नव्हता. मोठ्या प्रयत्नानंतर ओटीपी प्राप्त झाला. माहितीही अपलोड झाली. पण सादर करा या बटनवर क्लिक केल्यानंतर पुढे काहीच होत नाही.
- विश्वजित टेकाडे, शेतकरी मोरगाव सादीजन