सद्य:स्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असून, यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वयस्क रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटांसाठी वणवण भटकावे लागत आहे. वयस्क रुग्णांसोबतच कोविडग्रस्त बालकांचाही लक्षणीय आकडा आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसेल, असे संकेतही तज्ज्ञांकडून दिले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोविडग्रस्त बालकांसाठी खाटांचे नियोजन सुरू आहे. खाटांची संख्या वाढविली तरी बालरुग्णांवर उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांची गरज भासणार आहे, मात्र जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बालरुग्णांची संख्या अगदी तोकडी आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा बालकांवर गंभीर प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्यावर उपचार कसा होईल, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोविडग्रस्त बालकांच्या उपचारासाठी काही खासगी रुग्णालयेदेखील हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांपुरता हा प्रश्न निकाली लागेल, मात्र शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असणार आहे.
ग्रामीण भागातील परिस्थिती वाईट
जिल्ह्यातील कोविडच्या गंभीर रुग्णांचा बहुतांश भार सर्वोपचार रुग्णालयासह महानगरातील इतर शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांवर आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यांच्यावर तत्काळ उपचाराची सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध नाही. शिवाय, ग्रामीण भागात बालरोग तज्ज्ञही पुरेसे उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.
एनआयसीयू खाटा वाढविण्याची गरज
शासकीय यंत्रणेंतर्गत सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे एनआयसीयू युनिट कार्यरत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यातील बालरुग्णांचा भारही याच दोन एनआयसीयू युनिटवर आहे. अशा परिस्थितीत बालकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास तसेच गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्यास एनआयसीयू युनिटचीही गरज भासणार आहे.
सद्य:स्थितीत बालकांमध्ये कोरोना आढळत असला तरी त्यांच्यावर कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला नाही. लहान मुलांमध्ये कोरोनाचे गंभीर लक्षणे दिसून आलेली नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेमार्फत सद्य:स्थितीत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटांचे नियोजन केले जात आहे, मात्र प्रादुर्भाव वाढल्यास बालरोगतज्ज्ञांसोबतच एनआयसीयू युनिट वाढविण्याची गरज भासणार आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र - ३०
बालरोग तज्ज्ञ -
उपजिल्हा रुग्णालय बालरोगज्ज्ञ - १
जीएमसी - ३
लहान मुलांमध्ये कोविडच्या उपचारपद्धती
लहान मुलांमध्ये कोविडची सौम्य लक्षणे असून, साध्या उपचाराने ते बरे होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे मत आहे. बालकांवर रेमडेसिविरच्या वापराबद्दल निश्चित मार्गदर्शक सूचना नाहीत, मात्र इम्युनोग्लोबोलिन नावाच्या औषधाचा लहान मुलांसाठी उपयोग केला जातो, असेही सर्वोपचार रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनीत वरठे यांनी सांगितले.
एकूण कोरोनाबाधित - ५४,५८७
बरे झालेले रुग्ण - ४७,८७५
उपचार सुरू असलेले रुग्ण - ५६७५
० ते १२ वर्ष वयोगटातील रुग्ण - १०४०
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात लहान मुलांच्या उपचाराचे नियोजन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्यसेवा, अकोला मंडळ