अकाेला : शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरासह शिकवणी वर्ग परिसरात राेड साइड राेमिओचा हैदाेस प्रचंड वाढला आहे़ राेडराेमिओंचे कट्टे वाढले असल्यामुळे घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ जवाहर नगर, रणपिसे नगर, गाेरक्षण राेड, जठारपेठ या शाळा व महाविद्यालयांच्या परिसरासह शिकवणी वर्ग परिसरातील रस्त्यावर रोडरोमिओंच्या गँग मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची मनीषा बाळगून उभे राहतात. याच युवकांच्या टाेळक्याकडून मुलींना प्रेमजाळ्यात ओढून त्यांची छेडखानी तसेच त्यांचा लैंगिक छळ करण्याचे प्रकारही घडले आहेत़ वयात येणाऱ्या मुली चुकीच्या पद्धतीने प्रेमाच्या आमिषाला बळी पडून घर सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचे बरेचसे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. निर्भया पथकाने विशेष लक्ष पुरवून रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
.................
महाविद्यालयांसमाेर टाेळके
शहरातील आकाेट फैल राेडवर असलेल्या एका महाविद्यालयातच टाेळके पाेसण्यात आले आहे़ या टाेळक्यांचा मुलींना प्रचंड त्रास आहे़ महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांशी सलगी साधत हे टाेळके मुलींना छेडत आहेत़ मात्र शिक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या टाेळक्यांची तक्रार करण्याची हिंमत मुलींमध्ये नसल्याची माहीती आहे़
शिकवणी वर्ग परिसर
जवाहर नगर, गोरक्षण राेड, रणपिसे नगर, राऊतवाडी या परिसरात शिकवणी वर्गाला जाणाऱ्या मुलींची छेड काढण्यात येते़ पाेलिसांची गस्त पाहिजे त्या प्रमाणात नसल्याचे मुलींचे म्हणणे आहे़
............
पीकेव्ही-येवता राेडवर गर्दी
पीकेव्ही तसेच येवता राेडवर मित्र-मैत्रिणी फिरायला जातात, मात्र त्यांचाही पाठलाग करीत त्यांना त्रास देण्यात येत असल्याची माहिती आहे़ या परिसरातील राेडराेमिओ मुलींना प्रचंड त्रास देत असल्याचेही वास्तव आहे़
...................
दामिनी पथक गावाबाहेर
दामिनी व निर्भया पथकाकडून राेडराेमिओंवर कारवाई करण्यासाठी एक नवीन क्रमांक देण्यात आला आहे़ हे पथक गावात कमी अन् गावाबाहेर जास्त फिरत असल्याचे वास्तव आहे़ पथकातील कर्मचारी माेबाईलमध्ये गुंग असल्याच्याही तक्रारी अनेकांनी लाेकमतकडे केलेल्या आहेत़
.................
शहरात महिला व मुलींच्या छेडखानीवर पूर्णत: नियंत्रण आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले असले तरी यासंदर्भात कुणाची तक्रार आल्यास तत्काळ प्रभावाने कारवाई केली जाते. मुलींनीही ‘अलर्ट’ राहून स्वत:सोबत काही चुकीचे होत असल्यास न घाबरता तक्रार करावी.
-माेनिका राऊत, अपर पाेलीस अधीक्षक, अकाेला