अकोला: कोरोनाची रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. कोविडच्या या तिसऱ्या लाटेत हेल्थ केअर वर्कर्स सोबतच फ्रंटलाइन वर्कर्सची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. मात्र, या दोन्ही गटांत लसीकरणाविषयी उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५९.३८ टक्के हेल्थ केअर वर्कर्स, तर ५५.७४ टक्के फ्रंटलाइन वर्कर्सचेच दोन्ही डोस घेऊन झाले आहे. उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी असताना तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होताच, प्राधान्याने हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली. मोहिमेच्या सुरुवातीला दोन्ही गटांत चांगला उत्साह दिसून आला. मात्र, त्यानंतर या दोन्ही गटांत लसीकरणाच्या बाबतीत निरुत्साह दिसून आला. जिल्ह्यात १४ हजार ७४७ हेल्थ केअर वर्कर्स, तर १४ हजार २१६ फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार, आतापर्यंत १२ हजार २५ हेल्थ केअर वर्कर्सनी लसीचा पहिला डोस घेतला असून, केवळ ७ हजार १४१ जणांनी दोन्ही डाेस घेतले आहे, तसेच १४ हजार २१६ फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ ७ हजार १४२ जणांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले. लसीकरणाच्या बाबतीत असलेली ही उदासीनता कोविड रुग्णांच्या थेट संपर्कात येणाऱ्या हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या जीवावर बेतू शकते.
एकूण हेल्थ केअर वर्कर्स - १४,७४७
पहिला डोस किती जणांनी घेतला - १२,०२५ - ८१.५४
दोन्ही डोस घेणारे - ७,१४१ -५९.३८
फ्रंटलाइन वर्कर्स -१४,२१६
पहिला डोस किती जणांनी घेतला - १२,८१४ -९०.१४
दोन्ही डोस घेणारे - ७,१४२ - ५५.७४
एकही डोस न घेतलेले
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाखांवर नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये १४ हजार ७४७ हेल्थ केअर वर्कर्स, तर १४ हजार २१६ फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ हजार ६२२ हेल्थ केअर वर्कर्स आणि १ हजार ४०२, अशा एकूण ४ हजार १२४ कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच जनजागृतीची गरज
लसीकरण मोहिमेंतर्गत हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्समध्ये उदासीनतेचे ठोस कारण समोर आले नाही. मात्र, काही कर्मचाऱ्यांना काेरोना झाल्याने त्यांनी लसीकरणास टाळले, तर काहींना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे, याशिवाय ज्यांनी आतापर्यंत लसच घेतली नाही, अशा कर्मचाऱ्यांमध्ये कोविड लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.